वेबसाईट्स डेव्हलप करण्याकरिता शेकडो प्लॅटफॉर्म्स असतांना जगातल्या वन-थर्ड वेबसाईट्स (३४%+) एकट्या वर्डप्रेस मध्ये का तयार झाल्यात? – ५ कारणे.

आता, या क्षणाला, इंटरनेट वर किती वेबसाईट्स लाईव्ह असतील याचा अंदांज आहे तुम्हाला?

हे पोस्ट लिहीत असतांना १७५ करोड पेक्षा जास्त (म्हणजेच १.७५ बिलियन) वेबसाईट्स इंटरनेट वर लाईव्ह आहेत आणि प्रत्येक सेकंदाला हि संख्या वाढते आहे. थोडक्यात, वेबसाईट चे महत्व अनन्य साधारण असल्या कारणाने प्रत्येक लहान मोठ्या कंपनीला तर वेबसाईटची आवश्यकता आहेच पण प्रत्येक व्यक्तील सुद्धा त्याच्या पर्सनल ब्रॅण्डिंग साठी वेबसाईटची गरज आहे आणि म्हणूनच वेबसाईट्स ची संख्या फार वेगाने वाढते आहे.

सुरवातीच्या काळात वेबसाईट करण्याकरिता कोडिंग ची गरज असायची. उदाहरणार्थ HTML, JAVA, .NET, PHP अशा सारख्या प्रोग्रामिंग languages मध्ये वेबसाईट तयार व्हायच्या. पण thanks to CMS, आता कोडिंग ची अजिबात गरज नाही. CMS म्हणजेच Content Management System – वेब डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म चा एक असा प्रकार ज्या मध्ये वेबसाईट तयार करण्यासाठी कोडिंग किंवा प्रोग्रामिंग चे ज्ञान असण्याची अजिबात गरज नाही. हो, तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप वापरून CMS प्लॅटफॉर्म मध्ये वेबसाईट सहज पणे बनवू शकता. वर्डप्रेस, जुमला, शॉपीफाय, मॅजेंटो हि काही नावाजलेल्या CMS प्लॅटफॉर्म ची नावे आहेत.

वास्तविक पाहता वेबसाईट डेव्हलप करण्याकरिता शेकडो प्रोग्रामिंग languages आहेत आणि कदाचित तेवढेच कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टम (CMS) सुद्धा आहेत. पण वर्डप्रेस हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे आणि म्हणूनच इंटरनेट वरच्या प्रत्येक १०० वेबसाईट्स पैकी ३४ पेक्षा जास्त वेबसाईट्स एकट्या वर्डप्रेस मध्ये तयार झालेल्या आहेत. गेल्या ९ वर्षात वर्डप्रेस ची वाढ कशी झाली हे तुम्हाला खालील चार्ट बघून लक्षात येईल:

वरील चार्ट सविस्तर बघायचा असल्यास इथे क्लिक करा.

या चार्ट मध्ये “none” म्हणजेच Server Side Languages, अर्थात प्रोग्रामिंग किंवा कोडिंग मध्ये केल्या गेलेल्या वेबसाईट्स – त्यांचे प्रमाण बघा. जानेवारी २०११ मध्ये जे ७६% होते ते जानेवारी २०२० मध्ये ४३% इतके झाले – म्हणजेच ३३% नि कमी झाले. याचाच अर्थ असा कि प्रोग्रामिंग languages किंवा कोडिंग मध्ये वेबसाईट्स तयार करण्यापेक्षा लोकांचा कल हा CMS वापरण्याकडे कडे झपाट्याने जातो आहे. किंबहुना लोकांचा कल हा वर्डप्रेस वापरण्याकडे जास्त आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

२०११ जानेवारी मध्ये वर्डप्रेस चा मार्केट शेअर हा केवळ १३.१% होता तो जानेवारी २०२० मध्ये ३५.४% इतका वाढला. वर लिहिल्या प्रमाणे, याच दरम्यान प्रोग्रामिंग languages चा मार्केट शेअर ३३% नी कमी झाला आणि त्यातला २२% मार्केट शेअर एकट्या वर्डप्रेस ने स्वतः कडे आकर्षित केला. वर्डप्रेस चे हे खूप मोठे यश आहे.

दुसरी कडे फक्त CMS प्लॅटफॉर्म्स चा विचार केला तर त्यांच्या मार्केट शेअर चा सध्याचा ट्रेंड खालील प्रमाणे आहे.

वरील चार्ट सविस्तर बघायचा असल्यास इथे क्लिक करा.

फक्त CMS प्लॅटफॉर्म मध्ये डेव्हलप झालेल्या १०० वेबसाईट्स चा विचार केला तर एकट्या वर्डप्रेस चा मार्केट शेअर हा ६३% आहे, म्हणजेच उर्वरित सगळे CMS प्लॅटफॉर्म्स हे ३७% मध्ये गुंडाळल्या गेले आहेत. वर्डप्रेस अर्थातच १ नंबर वर आहे. दुसऱ्या नंबर वर असेलेले जुमला नामक CMS हे वर्डप्रेस चे सगळ्यात जवळचे स्पर्धक आहेत. जुमला CMS चा मार्केट शेअर हा केवळ ४.३% आहे, म्हणजेच वर्डप्रेस त्याच्या जवळच्या स्पर्धकापेक्षा १५ पटींनी पुढे आहे. थोडक्यात सध्या तरी CMS मध्ये वर्डप्रेस ला स्पर्धा नाही असे आपण म्हणू शकतो.

वर्डप्रेस एवढे लोकप्रिय का झाले त्याची ५ संयुक्तिक कारणे खालील प्रमाणे –

कारण १. फ्री-प्लगिन्स – हे वर्डप्रेस लोकप्रिय होण्याचे सर्व प्रथम कारण. वर्डप्रेस plugin म्हणजे एक प्रोग्राम जो तुम्ही वर्डप्रेस वेबसाईट मध्ये अगदी सहज पणे इन्स्टॉल आणि ऍक्टिव्हेट करू शकता. तुम्हाला तुमच्या वेबसाईट मध्ये वेग-वेगळे फीचर्स (वैशिष्ट्ये) किंवा युटिलिटी टूल्स टाकायचे असतील तर प्लगिन्स च्या आधारे अगदी सहजपणे ते काम करू शकता. हे फीचर्स किंवा वैशिष्ट्ये खालील प्रकारचे असू शकतात….

  1. कॉन्टॅक्ट फॉर्म (किंवा दुसरा कुठलाही कस्टमाइज्ड फॉर्म)
  2. टेस्टिमोनिअल्स कॅप्चर आणि पब्लिश करण्यासाठी (युटिलिटी)
  3. सोशल मीडिया शेअरिंग बटन्स
  4. गुगल मॅप एम्बेड करण्यासाठी
  5. स्टॅटेस्टिक्स जाणून घेण्यासाठी (युटिलिटी)
  6. ऑनलाईन चॅटिंग करण्यासाठी
  7. फोटो गॅलेरी (विविध ऑप्शन्स)
  8. SEO करण्यासाठी (युटिलिटी)
  9. Backup घेण्यासाठी (युटिलिटी)
  10. मोबाईल वर calling button दाखवण्या साठी (जेणे करून युझर ला १० डिजिट चा मोबाईल नंबर टाईप करायची गरज नाही)

असे एक ना अनेक कारणे आहेत ज्या करता लोकांना फ्री-प्लगिन्स वापरता येतात. आज वर्डप्रेस च्या डिरेक्टरी मध्ये ५५ हजार (होय पंचावन्न हजार) पेक्षा जास्त फ्री-प्लगिन्स आहेत. यातील कुठलेही प्लगिन आपण वापरू शकतो. आपल्याला फक्त एवढेच करायचे असते कि वर्डप्रेस डॅशबोर्ड मध्ये Add New Plugin च्या विंडो मध्ये गेल्या नंतर सर्च बार वर आपल्याला जे फिचर पाहिजे त्याचा किवर्ड किंवा किफ्रेज टाकल्यास वर्डप्रेस तुम्हाला प्लगिन्स ची लिस्ट दाखवते किंवा suggest करते. त्या पैकी कुठलेही एक संयुक्तिक प्लगिन निवडून व इन्स्टॉल करून ऍक्टिव्हेट केल्यानंतर त्याला सहज पणे कॉन्फीगर करता येते… त्याकरिता कुठल्याही कोडिंग किंवा प्रोग्रामिंग च्या knowledge ची गरज लागत नाही.

वर्डप्रेस ने suggested प्लगिन्स ची लिस्ट दाखवल्या वर नेमके कुठले प्लगिन निवडायचे हे कसे ठरवायचे? सोपे आहे. खालील इमेज मध्ये SEO साठी लागणारे प्लगिन शोधलेले आहेत. प्रत्येक प्लगिन च्या खाली त्यांच्याशी संबंधित ४ पॅरामीटर्स च्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. ते चार पॅरामीटर्स पुढील प्रमाणे (१) रिव्ह्यू (२) Number of ऍक्टिव्ह इंस्टॉलेशन्स (३) लास्ट अपडेटेड (किती पूर्वी अपडेट केलेले आहे) (४) तुमच्या वर्डप्रेस व्हर्जन सोबत ची कॉम्पॅटिबिलिटी (आहे किंवा नाही). – हे चारही पॅरामीटर्स तुम्हाला कुठले प्लगिन घायचे हे ठरविण्यासाठी मोलाची मदत करू शकतात. तुम्ही तेच प्लगिन घेणार (अ ) ज्याचे जास्तीत जास्त इन्स्टॉलेशन्स आहेत, (ब ) ज्याला जास्तीत जास्त रिव्ह्यू मिळाले आहेत आणि ऍव्हरेज रिव्ह्यू रेटिंग हे ४ किंवा ५ स्टार आहे (क) जे एवढ्यातच अपडेट झालेले आहे (अपडेट चा पिरेड जेवढा लहान तेवढे चांगले) (ड ) ज्याची तुमच्या वर्डप्रेस व्हर्जन सोबत ची कॉम्पॅटिबिलिटी आहे.

तुम्ही एखादे प्लगिन इन्स्टॉल करण्याचे नक्की केल्यास, इन्स्टॉल करायच्या अगोदर त्या प्लगइन च्या “More Details” लिंक वर क्लीक करून त्याच्या युटिलिटी बाबतीत सर्व माहिती समजावून घेणे कधीही चांगले. ते प्लगिन आपली गरज पूर्ण करीत आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

प्लगिन निवडतांना ४ पॅरामीटर्स ची व्हॅल्यू पाहणे गरजेचे आहे

२. फ्री-थीम्स आणि डेमो इम्पोर्ट – थीम म्हणजे टेम्प्लेट – तुम्हाला कुठल्या बिझिनेस साठी किंवा कुठल्या purpose साठी वेबसाईट तयार करायची आहे त्या प्रमाणे तुम्ही थीम (किंवा टेम्प्लेट) घेऊ शकता. उदाहरणार्थ क्लिनिक, रियल इस्टेट (बिल्डर), consultant, हॉटेल, रेस्टॉरंट, ट्रेनिंग कोर्स, इंटिरिअर, इत्यादी आणि इतर सर्व प्रकारच्या businesses साठी वर्डप्रेस थीम्स उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त multi purpose थीम्स हा एक असा प्रकार आहे ज्यात आपण कुठल्याही business ची किंवा कुठल्या हि purpose साठी ची वेबसाईट तुम्ही तयार करू शकता. वर्डप्रेस च्या डिरेक्टरी मध्ये जवळपास १०,००० (दहा हजार) फ्री-थीम्स उपलब्ध आहेत. या शिवाय तुम्हाला पेड किंवा प्रो थीम घ्यायची असेल तर तो सुद्धा पर्याय उपलब्ध आहे.

प्लगिन असो किंवा थीम – माझ्या अनुभवा प्रमाणे सध्याच्या फ्री-थीम्स आणि फ्री-प्लगिन्स खूपच छान आणि sophisticated आहेत आणि म्हणूनच जवळ पास ९०% प्रोफेशनल वेबसाईट्स या फ्री-थीम्स आणि फ्री प्लगिन्स वापरून तयार केल्या जाऊ शकतात.

प्रत्येक business साठी असलेल्या एकाहून एक सुंदर फ्री-थीम्स हे वर्डप्रेस च्या लोकप्रियतेचे एक प्रमुख कारण आहे.

फ्री-थीम हे जसे महत्वाचे आहे तसेच डेमो इम्पोर्ट सुद्धा महत्वाचे आहे. बऱ्याच कंपन्या आता त्यांच्या फ्री-थीम्स सोबत डेमो इम्पोर्ट चे सुद्धा पर्याय उपलब्ध करून देत आहेत ज्याने आपले काम अक्षरशः चुटकी सारखे होते.

डेमो इम्पोर्ट म्हणजे काय? – प्रत्येक थीम ची एक डेमो वेबसाईट असते त्याला लाईव्ह डेमो असे सुद्धा म्हणतात. त्या-त्या थीम ची डेमो वेबसाईट (किंवा लाईव्ह डेमो) बघूनच आपण ती थीम आपल्या वेबसाईट साठी निवडायची कि नाही हा निर्णय घेत असतो.

हे जणू काही सॅम्पल फ्लॅट सारखे आहे, जे पाहिल्यावर आपलाही फ्लॅट असाच होईल याची आपल्याला कल्पना येते. आपल्या वेबसाईट साठी जी थीम आपण निवडतो, ती थीम इन्स्टॉल आणि ऍक्टिव्हेट केल्यावर आपली वेबसाईट सुद्धा त्या थीम च्या डेमो वेबसाईट सारखी करू शकतो पण त्या साठी आपल्याला कस्टमाइझेशन करायचे असते. त्या करिता त्या थीम चे documentation सुद्धा बघण्याची गरज भासू शकते. या सगळ्या प्रक्रिये मध्ये वेळ जातो आणि मेहनत सुद्धा लागते. डेमो-इम्पोर्ट प्रक्रिये द्वारे हे सगळे परिश्रम आपण टाळू शकतो व कस्टमाइझेशन ला लागणार वेळ सुद्धा वाचवू शकतो. डेमो-इम्पोर्ट ऑप्शन द्वारे आपण त्या थीम ची डेमो वेबसाईट अगदी काही क्लिक्स मध्ये आणि काही मिनिटात आपल्या डोमेन वर इम्पोर्ट (किंवा कॉपी) करू शकतो. त्यानंतर राहते ते फक्त कन्टेन्ट रिप्लेसमेंट आणि डिझाईन मध्ये थोडे फार बदल. कि झाली तुमची वेबसाईट तयार.

फ्री-थीम्स मध्ये डेमो इम्पोर्ट – सगळ्याच फ्री-थीम्स मध्ये डेमो इम्पोर्ट चे ऑप्शन उपलब्ध नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. किंबहुना ज्या कंपन्यांच्या फ्री-थीम्स मध्ये डेमो इम्पोर्ट ची सुविधा उपलब्ध आहे त्याच कंपन्यांच्या फ्री-थीम्स आपण वापरल्या तर आपले काम खूप सोपे होते.

खालील काही वर्डप्रेस थीम कंपन्यांच्या फ्री थीम्स मध्ये डेमो इम्पोर्ट ची सुविधा आहे.

ThemeGrill.Com

AcmeThemes.com

Prodesigns.Com

प्रत्येक कंपनी ची डेमो इम्पोर्ट ची पद्धत हि वेगळी असते. वरील ३ कंपन्यांच्या सगळ्या फ्री थीम्स ची बेरीज हि १०० च्या वर जाऊ शकेल.

३. हेल्प – वर्डप्रेस हे एक ओपन सोर्स आणि फ्री CMS असल्या कारणाने लाखो लोकं ते वापरत आहेत. गुगल आणि युट्युब वर त्या बद्दल ची हेल्प करणारे अनेक पोस्ट्स आणि व्हिडिओज तुम्हाला अगदी सहज पणे मिळतात. विशेषतः विदेशी मंडळीं चा यात मोलाचा वाटा आहे. एखाद्या खूप किचकट विषयावर सुद्धा तुम्हाला सहजपणे मदत करणारे पोस्ट किंवा विडिओ मिळतो.

वर्डप्रेस मध्ये एखादी गोष्ट कशी करावी या करिता तुम्हाला युट्युब मध्ये भरपूर व्हिडिओज मिळतील. उदाहरणार्थ: “How To Create Menu In WordPress Website” हि किफ्रेज तुही युट्युब च्या सर्च बार मध्ये टाकली तर युट्युब तुम्हाला त्या विषयावरचे अनेक व्हिडीओ दाखवते. तुम्हाला जर हिंदी व्हिडीओ पाहिजे असेल तर ” How To Create Menu In WordPress Website – Hindi” अशी किफ्रेज टाका कि तुम्हाला हिंदी भाषेतील व्हिडिओज पहिले दिसतील.

त्याच प्रमाणे जरका एखाद्याला वेबसाईट वर अपलोड होत असलेल्या PNG फाइल्स ला JPG करायचे असेल आणि त्या करीत प्लगिन शोधायचे असेल तर गुगल कामात येते (आणि wordpress.org सुद्धा).

४. – युझर फ्रेंडली – शिकण्यासाठी अत्यंत सोपे. तुम्हाला जर MS WORD किंवा MS EXCEL सारखे सॉफ्टवेअर्स हाताळता येत असतील तर तुम्ही वर्डप्रेस सहज पणे शिकू शकता. वर्डप्रेस चा डॅशबोर्ड खूपच युझर फ्रेंडली आहे.

वर्डप्रेस चा डॅशबोर्ड

वर म्हंटल्या प्रमाणे गुगल व युट्युब वर भरपूर हेल्प असल्या कारणाने शिकण्यास खूप कष्ट घ्यावे लागत नाहीत. बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनेल्स आहेत जे तुम्हाला वर्डप्रेस विनामूल्य शिकवतील, wpbeginner.com हि एक अशी वेबसाईट आहे जी एका नवशिक्या (newbee) ला सुद्धा वर्डप्रेस शिकवून देऊ शकते.

५ – SEO कॉम्पॅटिबिलिटी – वर्डप्रेस च्या वेबसाईट ला SEO करण्यासाठी खूप परिश्रम लागतात असे म्हंटल्या जाते, पण माझा स्वतः चा अनुभव मात्र अगदी उलट आहे. वर्डप्रेस च्या वेबसाईट्स या गुगल वर ऑरगॅनिक रँकिंग करता बऱ्याच वेळा काही कष्ट न घेता सुद्धा optimized होतात. माझ्या स्वतः च्या व कस्टमर च्या वेबसाईट्स काही वेगळे परिश्रम न घेता optimized झालेल्या बघतानाचा सुखद धक्का मी अनेक वेळा अनुभवला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे URL structure. गुगल बॉट ला समजेल असे सहज व सोपे URL structure वर्डप्रेस करत असल्या कारणाने तुमची वर्डप्रेस वेबसाईट लगेच index होते.

SEO साठी Yoast हे माझे आवडते प्लगिन आहे. वर्डप्रेस मध्ये SEO साठी Yoast हे सगळ्यात पहिले व जुने प्लगिन. आता Yoast ला बरीच कॉम्पिटिशन आलेली आहे पण माझा स्वतः चा चॉईस हे योस्ट च आहे. Keyword optimization आणि readability चे काही बेसिक पॅरामीटर्स वर ग्रीन (ओके) होण्याकरिता Yoast प्लगिन आपल्याला मोलाची मदत करते.

माझा निष्कर्ष: वर्डप्रेस हे एक अफलातून CMS आहे एवढेच नव्हे तर आज च्या घडीला मी वर्डप्रेस ला blessings मानतो. भरपूर गोष्टी आहेत ज्या वर्डप्रेस बद्दल बोलता व सांगता येतील. एका वेब पेज ने वर्डप्रेस चे १०१ फायदे सांगितले आहेत. पण वरील पाच मुद्देच सगळ्यात महत्वाचे आहेत ज्या मुळे वर्डप्रेस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *